पाकिस्तानवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरात प्रशासन सतर्क झालं असून, संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने मॉक ड्रिल्स घेण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाबाहेर मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं.
या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे वागावं, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दल, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनी या मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला.
मुख्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, "देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांची सज्जता तितकीच महत्त्वाची आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रक्रियांची माहिती नागरिकांना देण्याचा उद्देश होता."
पाकिस्तानवर झालेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात मॉक ड्रिल्स घेणे ही काळाची गरज असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.