कांदिवली पूर्व परिसरामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत, तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व घडत होतं, आणि ती पीडित मुलगी आरोपीचा छळ निमूटपणे सहन करत होती. पण पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप पांडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तो कांदिवली पूर्वमधील हनुमान नगर येथील पाल राजेंद्र इंग्लिश हायस्कूलमध्ये गणित विषयाचा शिक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपी शिक्षक कुलदीप पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपी ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुलदीप पांडे वारंवार या मुलीकडे जाऊन तिला स्पर्श करायचा, तुला शकवलेलं काही समजलं की नाही, असं विचारतायचा. समजले नाही तर मला परत विचार, मी तुला सांगेन, असे म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. आरोपी कुलदीप पांडे याने अनेक विद्यार्थिनींचा असाच लैंगिक छळ केला असावा, असा संशय आहे, दरम्यान या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.