भिवंडीत आदिवासी जमिनीवरील अतिक्रमणावर अखेर पालिकेचा हातोडा
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील खंडुपाडा येथील आदिवासी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले यंत्रमाग कारखान्यांवर अखेर पालिका प्रशासनाने हातोडा चालवला असून मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील मौजे निजामपूर येथील सर्व्हे क्रमांक 51/2 अ ही 30 गुंठे जमीन बायाबाई रामू गुणगुणे यांच्या मालकीची असून या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करीत यंत्रमाग कारखाने बनविले होते. याबाबत बायाबाई यांचा मुलगा राजू गुणगुणे यांनी पालिका प्रशासनाकडे 2016 मध्ये सर्वप्रथम तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. या जमिनीची मालकी गुणगुणे कुटुंबीयांची असल्याचा निवडा भिवंडी तहसीलदार यांनी 2018 मध्ये देत त्या जागेवरील अतिक्रमण हटवावे असे पालिकेस निर्देश दिले होते. तेव्हापासून प्रत्येक वेळी टाळाटाळ होत असल्याने रेंगाळलेली कारवाई अखेर मंगळवारी करण्यात आली.या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेले चार यंत्रमाग कारखाने जेसीबी च्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले आहेत. आम्ही दहा वर्षांहून अधिक काळ आमच्या हक्काच्या जमिनीसाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली झगडत होतो. पालिका प्रशासन प्रत्येक वेळी वेगवेगळी कारण देऊन तर कधी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई होत नसल्याने आमची निराशा होत होती.अखेर आज कारवाई झाल्याने आम्हाला न्याय मिळाला असल्याने आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया राजू गुणगुणे यांनी दिली आहे.
राजू गुणगुणे
नरेश साळकर