नाशिक: राजदेरवाडी व इंद्रायणी वाडीतील आदिवासी वस्तीला पाणी व वीज पुरवठ्यासाठी खासदार भगरे यांचे प्रशासनाला आदेश
राजदेरवाडी व इंद्रायणीवाडी या नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून वीज व पाण्याच्या मूलभूत सुविधा नाहीत. या गावातील नागरिकांचे जीवन अत्यंत हाल अपेष्टांनी भरलेले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज राजदेरवाडी ग्रामपंचायत सभागृहात चांदवड तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना गावात वीज व पाणी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यांनी यावेळी सांगितले की, “हाथ्याड धरणाचे काम खूप पूर्वी व्हायला हवे होते, मात्र ते माझ्या अगोदरच्या प्रतिनिधींनी दुर्लक्षित केले. मी सत्तेत नसतानाही या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन.” बैठकीत बोलताना स्थानिक नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. “आमच्याकडे ना लाईट आहे, ना पाणी. अशा परिस्थितीत आमची मुले शिक्षणात कशी पुढे जातील?” असा प्रश्न आदिवासी महिला केदाबाई अनिल गोधडे यांनी उपस्थित केला. राजदेरवाडी गाव नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणी असूनही येथे पडणाऱ्या २५० ते ३०० मिमी पावसाचा उपयोग होत नाही. हे पाणी वाहून जाते. त्यामुळे येथे पाणी अडवण्यासाठी छोट्या मोठ्या बंधाऱ्यांची गरज आहे, अशी मागणी स्थानिक शहू शिंदे व दादाजी हरी जाधव यांनी केली. २००३–०४ पासून या भागात वनजमिनीवर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी राहत आहेत. मात्र त्यांना शाळा, दवाखाना, अंगणवाडी, शासकीय स्वस्त धान्य दुकान अशा मूलभूत सुविधा अजूनही मिळालेल्या नाहीत. “या त्रुटी भरून काढण्यासाठी कृती करावी,” अशी मागणी नागरिक जगन यशवंत यांनी केली. खासदार भगरे यांनी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिल्याने, या आदिवासी भागाच्या दीर्घकाळच्या समस्यांवर लवकरच तोडगा निघेल, अशी स्थानिकांना आशा आहे. BYTE - भास्कर भगरे, खासदार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
शाऊ शिंदे, राजदेरवाडी
जगन यशवंते, राजदेरवाडी
दादाजी हारी जाधव, राजदेरवाडी
केदाबाई अनिल गोदाडे, आदिवासी वस्ती राजदेरवाडी