नाशिक : 'कॅश नाही, अन्न-पाणी देऊ' चळवळ – भिकाऱ्यांना पैसे देण्यास नकार"
नाशिकमध्ये 'चैत्र बहुउद्देशीय संस्था'च्या वतीने एक अनोखी सामाजिक चळवळ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर, सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी भीक मागणाऱ्यांना रोख रक्कम न देता अन्न व पाणी देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या चळवळीचे उद्दिष्ट भिकारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करणे आणि बालअपहरणासारख्या गुन्ह्यांना आळा घालणे हे आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये यापूर्वीच सुरू झालेल्या या उपक्रमाला नाशिककरांनीही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती संस्थेचे संतोष हुदलीकर, संजय पाटील, अॅड. अभिजीत बगदे, चैत्रा हुदलीकर आदींनी केली आहे.
"जर भीक द्यायचीच असेल, तर बिस्किटांचे पुडे ठेवा; पण एकही रुपया कॅशमध्ये देऊ नका," असे आवाहन करत नागरिकांनी या चळवळीत प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला आहे.