नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंबड गुन्हे शाखा आणि गंगापुर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सराईत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेचे पोउनि. मोतीलाल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीचा मोबाईल विक्रीसाठी गंगापुर रोड, बारदान फाटा परिसरात येणार आहे. त्यानुसार वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी सापळा रचून महेश बळीराम शिरसाठ (वय ३३, रा. अशोकनगर, सातपुर) यास दि. २७ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून ओपो कंपनीचा मोबाईल, दोन सोन्याच्या रिंगा आणि चांदीची चैन असा एकूण २०,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौकशीत त्याने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दारूच्या नशेत ध्रुवनगर परिसरातील एका बंद रो हाऊसचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१४/२०२५ भा.द.वि. कलम ३०५(अ), ३३१(३)(४) प्रमाणे गुन्हा दाखल होता, जो आता उघडकीस आला आहे.
महेश शिरसाठ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सटाणा, चाळीसगाव, सातपुर, गंगापुर, सरकारवाडा, नाशिकरोड व भद्रकाली पोलीस ठाण्यांत घरफोडी, चोरी, मारामारी आणि खूनाचे मिळून १६ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत, पोउनि. मोतीलाल पाटील, पो.हवा. प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पो.अं. भगवान जाधव, चारूदत्त निकम, सविता कदम (अंबड गुन्हे शाखा) तसेच पो.अं. मच्छिंद्र वाकचौरे आणि पो.अं. गांगुर्डे (गंगापुर पो.ठा.) यांनी केली.