नाशिकमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायवेलगत एका जोडप्याला दोन तरूण मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाऊस पडत असताना महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती, पोलिसांना फोन लावा रे... शेवटचं माफ करा अशी गयावया मारहाण करणाऱ्यांना करत होती. मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. त्यातील एक जण तर मारहाण करत असताना दुसऱ्याला दगड आणायला लावत होता. या हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेल्या तरूणाचे रोहित गोरडे असे नाव आहे. रोहित याला लाकडी दांड्याने डोक्यावर वार करण्यात आला आहे. नाशिकमधील इंदिरानगरच्या बोगद्याजवळ ही सर्व मारहाणीची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. इंदिरानगर बोगद्याजवळ जुन्या वादातून सशस्त्र हल्ला झाल्याची माहिती समजत आहे. 'आज तुझे कामच वाजवतो' म्हणत मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.