भिवंडी तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी ८१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया नुकतीच पार पडली. या धर्तीवर ग्रामपंचायतीची आगामी निवडणूक लक्षात घेता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत असून अशातच भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी सरपंच नितेश पाटील उर्फ बाळा सेठ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भिवंडीत शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात असून खारबाव (शप) गोटात खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान खारबाव गावातील मनसे, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भाजपाचे माजी पंचायती राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजप पक्षाची माळ बाळा पाटील यांच्यात गळ्यात घातली आहे. त्यामुळे बाळा पाटील यांच्या भाजपातील पक्ष प्रवेशाने खारबाव गोटातील शरदचंद्र पवार गटात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान याप्रसंगी प्रतिक्रिया देताना कपिल पाटील यांनी सांगितले की, नुकतेच प्रथमच ठाणे जिल्ह्याला रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने प्रदेशाध्यक्ष पद लाभले असून ही ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून अनेक तालुक्यांमध्ये विरोधी पक्षातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत असून अशा कार्यकर्त्यांना इतर पक्षात मिळणाऱ्या मान सन्मानापेक्षा भाजपात अधिकाधिक मानसन्मान दिला जाणार आहे. यासह विकासाच्या दृष्टीने भाजपात नुकत्याच पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही अशी ग्वाही सुद्धा कपिल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
याप्रसंगी खारबाव गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य नितेश पाटील उर्फ बाळा सेठ यांनी कार्यकर्त्यांसह महायुतीमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रवेश केल्याचे सांगितले. तर गाव भकास करणाऱ्या आणि खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी च्या उमेदवारांना ही चपराक असून खारबाव गावातील खेळाचे मैदान, विजेची व पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे व येत्या काळात खारबाव ग्रामपंचायतीवर भगवा फडकवणार असल्याचे मत इंजि.ज्ञानेश्वर मुकादम उर्फ ओम भाऊ सचिव शिवसेना शिंदे गट भिवंडी यांनी शुभेच्छा देतांना व्यक्त केले. यावेळी भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील,भाजपा उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरव आदींसह खारबाव गावातील मनसे,शिंदे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.