निफाड तालुक्यातील जळगाव फाटा येथे जुन्या वादातून सुंदरपूर येथील सिद्धार्थ साळवे या युवकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विशाल केडाळे, पृथ्वी जाधव, मयूर ढगे, बाळा बर्डे आणि विजय शिंदे या टोळीने गावठी पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या युवकाच्या खांद्याला व पोटाला चाटून गेल्याने तो थोडक्यात बचावला. युवकाला किरकोळ जखमा झाल्या असून मोठा अनर्थ टळला आहे.
गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच, या प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी रवींद्र मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सध्या निफाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय हर्षल भोळे व पथक फरार आरोपींचा शोध घेत आहेत.