"ओबीसी समाज मोठा आहे, चुकीच्या मार्गाने लोकं भरले जात आहेत": छगन भुजबळ

  • MG News
  • ऑक्टोबर 10 2025

Share on  

नाशिक येथे आज राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण, जरांगे- व विखे भेट, सरकारची भूमिका आणि ओबीसी समाजातील असंतोष या विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

भुजबळ म्हणाले, “मी काल जरांगे आणि विखेंची भेट टीव्हीवर पाहिली. विखे मंत्रिमंडळाचा किंवा पक्षाचा निरोप घेऊन गेले का, हे मला ठाऊक नाही. पण आरक्षणावरील जीआर निघाल्यानंतर १४ ते १५ आत्महत्या झाल्या आहेत. लोकांना वाटू लागलं आहे की आमचं आरक्षण संपलं. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी सर्व समाजांना विश्वासात घेऊन काम केलं. सध्या जे चाललं आहे, ते समाजात भ्रम निर्माण करतंय. ओबीसी वर्ग मोठा आहे, कुण्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही. वेगवेगळ्या समाजातील लोकं आत्महत्या करत आहेत, ही धोक्याची घंटा आहे.”

ते पुढे म्हणाले, “EWS आरक्षण दिलं तेव्हाही मराठा समाज समोर होता, तेव्हा आम्ही विरोध केला नाही. आमचं म्हणणं एवढंच की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. खोट्या सर्टिफिकेटवर आरक्षण घेतलं जात आहे. सकाळी अर्ज केल्यावर संध्याकाळी प्रमाणपत्र मिळतंय, हा प्रकार चुकीचा आहे. खऱ्या कुणबी समाजाने याला विरोध केला आहे. आगरी समाज, विविध संघटना मोर्चे काढत आहेत. अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने लोकं भरत आहेत.”

जरांगे यांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, “जरांगे आमच्या विरोधात सातत्याने बोलतात, अपशब्द वापरतात म्हणून मी बोलतो. आम्ही कोर्टाचा मार्ग स्वीकारला आहे. ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. कुणाला शिव्या देणं आमचं धोरण नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, गाड्या जाळल्या जात आहेत. सरकार ऐकत नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने कोर्टात जाऊ.”

विखे–वडेट्टीवार आरोपप्रकरणी ते म्हणाले, “तो निर्णय त्यांनीच घेतला, त्यामुळे तेच आता डिफेन्ड करत आहेत. जी परिस्थिती निर्माण केली गेली ती प्रेशरखाली झाली आहे. तसेच ओबीसीलाही प्रेशर करावं लागेल.”

बीड येथील मोर्च्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं, “हा सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे, समता परिषदेने तो आयोजित केला आहे. आमच्या सभेत मराठा समाजाला टार्गेट केलं जात नाही, पण जर कोणी आमच्यावर बोललं, तर उत्तर आम्हीही देतो. हॉलंड-पोलंडपासून सगळं बोलणं सुरू झालंय, पण हे राज्य मराठी लोकांचं आहे, मराठ्यांचं नाही; यशवंतराव चव्हाणांनी हे सांगितलं होतं.”

नाशिकमधील गुन्हेगारीबाबत भुजबळ म्हणाले, “अलीकडे काही गुन्ह्यांच्या घटना ऐकल्या आहेत. त्यामुळे नाशिकची चुकीची प्रतिमा तयार होते आहे. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र निर्दोषांवर अन्याय होऊ नये.”

ते पुढे म्हणाले, “मी गृहमंत्री असताना मुंबईत गँगवार झालं होतं, पण आम्ही ते थांबवलं. ठरवलं तर पोलीस काहीही करू शकतात.”

अखेर भुजबळ म्हणाले, “ओबीसी समाजाने एकत्र राहून लढा द्यायला हवा. आमचा समाज शिक्षणाने आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे, पण आम्ही सत्यासाठी उभे आहोत. नवीन संघटना निर्माण होत आहेत, त्या बोलतील. पण सगळ्यांनी विचार करायला हवा, काहींवर प्रेशर आहे का?”

ही पत्रकार परिषद मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

संबंधित बातम्या