आगामी निवडणुकीत सत्ता ही ओबीसींनी हाती घेतली पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

आगामी निवडणुकीत सत्ता ही ओबीसींनी हाती घेतली पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
  • MG News
  • ऑक्टोबर 5 2025

Share on  

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला सत्तेवर आणण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “सत्ता ही आता ओबीसींनी हाती घेतली पाहिजे. ओबीसींची राजकीय ओळख निर्माण करून राज्यात सत्तेचा ताबा घेण्याची ही वेळ आली आहे,” असे आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

आंबेडकर म्हणाले की, “धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व करावं. २७ टक्के आरक्षण मिळवून हे तेलंगणा राज्यासारखं ६२ टक्क्यांवर नेणे शक्य आहे. महाराष्ट्र विधानसभेवर सत्ता मिळवली तर आरक्षणात वाढ करून समाजाला न्याय मिळवता येईल.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, “सत्ता ही ओबीसींनीच घेतली पाहिजे. लोकांनी SC-ST उमेदवारांना मतदान करावं, अन्यथा मुस्लिम उमेदवारांना पाठिंबा द्यावा. सुवर्ण लोकांनी अन्याय केला आहे, त्यामुळे ओबीसी समाजाने त्यांना मतदान करू नये. आपली सगळ्यांची सामाजिक आणि राजकीय ओळख ‘OBC’ म्हणून व्हायला हवी.”

तसेच त्यांनी समाजातील ऐक्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “सगळ्या समाजांना एकत्र आणून एक ओबीसी ओळख निर्माण झाली पाहिजे. १९८० पासून आम्ही ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आलो आहोत आणि आजही त्याच ध्येयाने काम करतोय.”

मुख्यमंत्रीपद किंवा सत्तेतील स्थानाबद्दल विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मला मुख्यमंत्री किंवा मंत्री व्हायचं नाही. माझं काम म्हणजे लोकांना सत्तेत आणणं हेच कार्य महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि मी त्यांचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय.”

संबंधित बातम्या