भाऊबीजच्या पहाटे नाशिककरांसाठी संगीताचा अप्रतिम सोहळा रंगला. प्रमोद महाजन गार्डन येथे झालेल्या पारंपरिक “भाऊबीज पहाट” कार्यक्रमात यंदा पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध झाले. “चप्पा चप्पा चरखा चले” या लोकप्रिय गीतावर संपूर्ण नाशिककर थिरकले. वाडकरांच्या सुरेल आवाजाच्या लयीवर नागरिकांनी बेधुंद होऊन गाण्याचा आनंद घेतला.
संगीताची ही सुरेल परंपरा आमदार देवयानी फरांदे यांनी गेली अनेक वर्षे अखंडपणे जपली आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या या मंगल प्रसंगी नाशिककरांसाठी संगीताच्या सुरांनी सजलेली पहाट रंगवण्याचा उपक्रम त्यांनी कायम ठेवला आहे. या मैफिलीत आजवर आनंद गांधर्व (आनंद भाटे), आरती अंकलेकर-टिकेकर, शौनक अभिषेकी, देवकी पंडित, पं. राहुल देशपांडे , आर्या आंबेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे.
यंदाच्या कार्यक्रमात पद्मश्री सुरेश वाडकर यांनी एकापाठोपाठ एक लोकप्रिय आणि भावपूर्ण गाणी सादर करत नाशिककरांना संगीताच्या सागरात बुडवले. त्यांच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांचा आणि “Encore!” चा वर्षाव केला. अनेक गाण्यांना वन्समोअर चा प्रेक्षकांनी आग्रह धरला.
कार्यक्रमाच्या अखेरीस “चप्पा चप्पा चरखा चले” हे गाणे सुरु होताच वातावरणात उत्साह आणि आनंदाची लाट उसळली. संपूर्ण उद्यानातील नाशिककर ताल धरून नाचू लागले, आणि हा क्षण अविस्मरणीय ठरला.
रसिकांचा उत्स्फूर्तपणा पाहून स्वतः सुरेश वाडकरही वयाच्या 72 व्या वर्षी थिरकण्याचा मोह आवरू शकले नाहीत! प्रेक्षकांनी त्यांच्या या सहभागाचे जल्लोषात स्वागत केले.
या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष निधीतून प्रमोद महाजन उद्यानाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पणही करण्यात आले. या लोकार्पण प्रसंगी बोलताना विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रमोद महाजन उद्यानाच्या देखभालीसाठी प्रशासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल व आमदार देवयानी फरांदे यांना तक्रारीची संधी दिली जाणार नाही असे आश्वासन दिले. या ठिकाणाचे सौंदर्य आणि आकर्षक प्रकाशयोजना या कार्यक्रमाला अधिक उजळवून गेली.
कार्यक्रमासाठी नागरिकांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. उपलब्ध असलेल्या 6000 खुर्च्या भरल्यानंतर अनेकांनी उभे राहून आणि गवतावर बसूनही मैफिलीचा आनंद घेतला.
संपूर्ण कार्यक्रमात नाशिककरांची संगीतावरील आसक्ती आणि सांस्कृतिक सहभाग याचे अप्रतिम दर्शन घडले.
या कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे यांच्यासह मा.विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, मा.आदिवासी विकास आयुक्त, श्रीमती लिना बनसोड, नाशिक पश्चिमच्या आमदार सौ.सिमाताई हिरे, आर.एस.एस.चे विभाग कार्यवाह श्री.प्रमोदजी कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह सुहासजी वैद्य, माजी आमदार श्री.बाळासाहेब सानप, भाजपा ज्येष्ठ नेते श्री.विजय साने, श्री.लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष श्री.सुनिल केदार, माजी नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे, सुनिल फरांदे यांच्यासह शहरातील मान्यवर, सामाजिक संस्था प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पदमश्री सुरेश वाडकर यांना वाद्यवृंद म्युजिक ॲरेंजमेंट ॲण्ड किबोर्ड श्री.सत्यजीत प्रभू. कि – बोर्ड श्री.सागर साठे बासरी श्री.अमर ओक गिटार श्री.मनीष कुलकर्णी . तबला श्री.विनायक नेटके, ढोलक व पख्वाज, श्री.कृष्णा मुसळे, ऑक्टोपॅड श्री.प्रभाकर मोसमकर यांनी साथ दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अजिंक्य फरांदे व त्यांच्या सहका-यांनी अथक प्रयत्न केले. माजी नगरसेविका स्वाती भामरे यांनी आभार व्यक्त केले.