पनवेल: १ ऑगस्टपासून विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन

पनवेल: १ ऑगस्टपासून विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

राज्यातील महसूल विभागाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, पनवेल तालुक्यातही याचे प्रभावीपणे आयोजन करण्यात येत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात हा सप्ताह एकाचवेळी राबविण्यात येणार आहे.

या सप्ताहादरम्यान शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी जमिनीशी संबंधित नोंदी, विविध दाखले, अतिक्रमण पट्टे वाटप, वाद निवारण, दाखले वाटप अशा महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता केली जाणार आहे. प्रशासनाने नागरिकांनी या सप्ताहात सहभाग घेऊन स्वतःचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन केले आहे.

विशेष सप्ताहाच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी महसूल विभागात कार्यरत व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार असून, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्हे वाटप करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना कायद्यानुसार अतिक्रमण पट्टे वाटपाचा विशेष कार्यक्रम सुद्धा राबविला जाणार आहे.

महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उरण तालुक्यातील शेतकरी, नागरिकांनी १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सप्ताहात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या