मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना जनता उत्तर देईल- मनोज जरांगे पाटील

मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना जनता उत्तर देईल- मनोज जरांगे पाटील
  • MG News
  • ऑक्टोबर 5 2025

Share on  

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओबीसी व मराठा आरक्षण विषयावर पुन्हा एकदा सरकार व काही नेत्यांवर निशाणा साधला. “मराठ्यांच्या विरोधात बोलणारा माणूस टिकणार नाही. अशा लोकांना जनता राजकीयदृष्ट्या संपवेल,” असा कठोर इशारा त्यांनी दिला.

मुंढे आणि इतर नेत्यांना इशारा-
जरांगे म्हणाले, “त्या दोघांनी भुजबळ यांच्या नादी लागू नये. मराठ्यांच्या नादी लागणं त्यांच्या राजकीय करिअरसाठी घातक ठरेल. तुम्ही मेहनतीने राजकीय अस्तित्व निर्माण केलं आहे, पण जर चुकीच्या नादी लागलात तर ते अस्तित्व संपेल.”
ते पुढे म्हणाले, “थोडी कामं केल्यावर आपल्याच लोकांना विरोध करणाऱ्यांचे पाय चाटू नका. मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना त्यांच्या जागी बसवणं भाग आहे. शेतात काम करा, पण कुणाच्या पाया पडू नका. त्यांच्या व्यासपीठावर जाऊन विरोध करणारे लक्षात ठेवायचे.”

 ‘लाभ घेणारे नेते’ यांच्यावर निशाणा-
जरांगे पाटील यांनी पुढे काही मराठा नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली. “आमचे नेते का खाली मान घालून जगतात हे समजत नाही. जेव्हा एखादा ओबीसी नेता मराठ्यांच्या विरोधात बोलतो, तेव्हा त्याचा राजकीय काटा काढला पाहिजे. मराठा नेते, अधिकारी आणि लोकांना या सरकारमध्ये सुख नाही. आता वेळ आली आहे ,यांचा गेम करावा लागेल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आमचे १६ टक्के आरक्षण आहे, आणि मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के दिले आहे. त्याला धक्का लावू नका, पण वरचे १६ टक्के आमचे आहे. १० तारखेला ते मोर्चा काढत आहेत, आम्ही पण रस्त्यावर उतरू, बोगस आरक्षण घेणाऱ्यांविरोधात.”
“१९९४ मध्ये ज्या बोगस जाती ओबीसी यादीत घातल्या, त्या तत्काळ रद्द कराव्यात,” अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री कोंडीत सापडलेले नाहीत, पण योग्य दिशेला गेले आहेत. मात्र त्यांच्या पक्षातील काही ओबीसी नेते एकत्र येऊन फडणवीस यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यांना अक्कल नाही का? मराठे गरजेचे आहेत हे आता त्यांनाही समजलं आहे.”
ते म्हणाले, “आता पिशव्या भरायला सुरुवात झाली आहे. मराठ्यांना १०० टक्के कुणबी प्रमाणपत्र मिळणारच.”

 लक्ष्मण हाके व भुजबळ यांच्यावर टीका-
जरांगे म्हणाले, “मी लक्ष्मण हाके यांना काही मोजत नाही. ते महत्त्वाचेही नाहीत. मराठे आणि धनगर समाजामध्ये काही वाद नाही; छगन भुजबळच हे सर्व मुद्दाम करत आहेत. मंत्रीपद आणि राजकारणासाठी हे लोक जात संपवायला निघाले आहेत.”

 अतिवृष्टी व सरकारविरोधी आंदोलन-
राज्यातील अतिवृष्टीबाबत बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला, “लवकरच मोठं आंदोलन उभं राहील. सरकारने भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावेत. देशात कधीच एवढा मोठा लढा झालेला नाही, आता होणार आहे.”

 अमित शहा दौऱ्यावर प्रतिक्रिया-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी आम्ही एवढं आंदोलन करतोय, त्यांनी हे लक्षात घ्यावं. सरकार शेतकऱ्यांसमोर चिल्लर ठरतंय.”

संबंधित बातम्या