फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तब्बल दोन दिवसांपासून फरार असलेला गोपाल बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. मध्यरात्री साडे बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास, गोपाल बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झाला. डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाईड नोटमध्ये गोपाल बदनेने अत्याचार केल्याचा थेट आरोप केला होता. यामुळे या प्रकरणात गोपाल बदनेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते.
घटना घडल्यापासून तो गेल्या दोन दिवसांपासून फरार होता, तर दुसरीकडे पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, काल रात्री अचानकच बदने स्वतः फलटण पोलिसांसमोर हजर झाला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या गोपाल बदने हा फलटण पोलिसांच्या कस्टडीत असून, आज दिवसभर त्याची चौकशी सुरू राहणार आहे. आज रविवार असल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार का? याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. या प्रकरणातील हा घडलेला अचानक टर्निंग पॉइंट असून, डॉक्टर महिलेच्या मृत्यूप्रकरणातील तपासाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
अटकेनंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत बदणे म्हणाला की, मी प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे. या वक्तव्यामुळे प्रकरणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला असून, पुढील चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्हा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.