पिंपळगाव: कारसूळला "इंटरॅक्टिव्ह स्क्रीन" यंत्रणेद्वारे शिक्षणाचे धडे

पिंपळगाव: कारसूळला
  • MG News
  • जुलै 20 2025

Share on  

सद्यस्थितीत पालकांना नकोशा असलेल्या शाळेत आता "इंटरॅक्टिव्ह स्क्रीन" यंत्रणेद्वारे शिक्षणाचे धडे दिले जात आहे. निफाड तालुक्यातील कारसूळ येथील जिल्हा परिषदेच्या पीएमश्री प्राथमिक शाळेत विद्यार्थी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करीत शिक्षण घेत आहे. या शाळेत सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचा निधी खर्च करून २५ फ्युचरिस्टिक क्लासरूम्स उभारण्यात आल्या आहेत. 
      अलीकडे पालकांना शिक्षण शहरात ‘स्वप्नवत’ वाटतं, तेच शिक्षण आता ग्रामीण महाराष्ट्रातही हाडामासाच्या शक्यतेत उतरू लागले आहे. त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा होय. कारसूळ शाळेने केवळ जिल्हा परिषदेचा ढाचा आणि मराठी माध्यमांना नवसंजीवनी दिली नाही, तर ग्रामीण शिक्षणाच्या भवितव्यालाच डिजिटल पंख दिले आहेत. या वर्गखोलीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ई-डेस्क, शिक्षकांसाठी ई-पोडियम आणि शिक्षण सुलभ करणारी इंटरॅक्टिव्ह स्क्रीन यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रणाली एफसीएमएस सॉफ्टवेअरद्वारे एकमेकांशी संलग्न आहे, ज्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाची त्वरित पाहणी करता येते. वह्यांची जागा स्क्रीनने घेतली असून, अभ्यासक्रम व्हिज्युअल, डिजिटल आणि इंटरअ‍ॅक्टिव्ह स्वरूपात विद्यार्थ्यांपुढे सादर केला जात आहे.

डिजिटलतेच्या जोडीने शालेय अभ्यासक्रमाबरोबरच मनोरंजनात्मक अ‍ॅक्टिव्हिटीज, व्हिडीओ क्लिप्स, ग्राफिक्स, ऑडिओज यांच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी, आनंददायी आणि लक्षवेधी बनले आहे. शिक्षक व पालक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होत असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती, प्रगती याबद्दल त्वरित अपडेट्स मिळत आहेत. या सर्व आधुनिक यंत्रणेमुळे शाळेतील व्यवस्थापन सुसंगत आणि पारदर्शक झाले आहे.
या डिजिटल क्रांतीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघचौरे, उपाध्यक्ष देवेंद्र काजळे, सदस्य भाऊसाहेब उगले, योगेश गांगुर्डे, गोविंद ताकाटे, नंदीप गाडे, सविता जाधव, विमल पवार, मीनाक्षी गोरे, वैशाली कंक, अंजली जाधव, खंडेराव शंखपाळ, मुख्याध्यापक राजाभाऊ कदम आणि उपशिक्षक रवींद्र सोसे, संतोष निरभवणे, रोहिदास तळेले, भाग्यश्री खैरनार, जिजा वसाळ, प्रिती चौधरी व ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले आहे.

वर्गांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात स्वतंत्र ई-डेस्क, डिजिटल अभ्यासक्रम, व्हिज्युअल आणि मल्टिमिडिया अ‍ॅक्टिव्हिटीज, शिक्षकांसाठी ई-पोडियम आणि संपूर्ण शाळा एफसीएमएस सॉफ्टवेअरद्वारे एकमेकांशी जोडलेली आहे. यामुळे शिक्षणाची प्रक्रिया केवळ सुलभच नव्हे, तर परिणामकारक आणि आनंददायी बनली आहे.
शिक्षण हे केवळ भिंती बांधून बदलत नाही, तर दृष्टिकोन आणि तळमळ यांच्या संगमातून क्रांती घडते. कारसूळच्या मातीतून उगम पावलेलं हे डिजिटल स्वप्न ही केवळ शाळेची प्रगती नाही, तर ग्रामीण शिक्षणाच्या नवयुगाची सुरवात आहे.
- राजाभाऊ कदम, मुख्याध्यापक, पीएमश्री जि.प.शाळा, कारसूळ

संबंधित बातम्या