राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर सरकारवर निशाणा साधला. लातूरमधील ओबीसी तरुणाच्या आत्महत्येपासून ते शिवसेना चिन्ह प्रकरण, जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांपर्यंत अनेक मुद्यांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
लातूर आत्महत्या प्रकरणावर गंभीर आरोप-
ओबीसी तरुणाच्या आत्महत्येच्या तपासावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “सरकारने या प्रकरणाचा तपास तीव्रतेने सुरू केला आहे, त्याचे स्वागत आहे. पण जेव्हा मराठा मुलांनी आत्महत्या केल्या, तेव्हा तितक्या गांभीर्याने तपास झाला नाही. ओबीसी तरुणाला सुद्धा मराठा म्हणून दाखवले गेले. मी सरकारवर गंभीर आरोप करतो की त्यांनी ओबीसी तरुणांचा खून केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “आरक्षणाच्या संदर्भात समाजात निर्माण झालेल्या भावनांचा सरकारने विचार करावा. जरांगेंच्या माध्यमातून सरकार ओबीसींचं आरक्षण घालवण्याचा प्रयत्न करत आहे.”
शिवसेना चिन्ह प्रकरणावर विश्वास व्यक्त-
शिवसेनेच्या चिन्हावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीबाबत वडेट्टीवार म्हणाले, “हा न्यायदेवतेसमोरील अत्यंत महत्वाचा विषय आहे. संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे की निकाल संविधान आणि कायद्यानुसारच लागेल. न्यायालयाला ही संधी मिळाली आहे की त्यांनी पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरणारा निर्णय द्यावा.”
अजित पवार - भुजबळ नाराजीबाबत प्रतिक्रिया-
अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मतभेदावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जरांगे समोर आले तेव्हा अजित पवार बोलले असते तर काही समतोल दिसला असता.”
ओबीसी नेत्यांची भूमिका स्पष्ट-
“आम्ही ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो. त्यांच्या हक्कांसाठी लढणं हे आमचं कर्तव्य आहे. जर कोणाला हे मान्य नसेल तर त्यांनी त्यांची भूमिका मांडावी, पण आम्ही थांबणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
नागपूर ओबीसी मोर्चा-
“हा माझा वैयक्तिक मोर्चा नाही, सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेला मेळावा आहे. मी कार्यकर्ता म्हणून त्यात सहभागी आहे. सर्व समाजबांधवांनी यात सहभागी व्हावे,” असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर टीका-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरील कार्यक्रमावर त्यांनी टीका करत म्हटलं, “महापालिका निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी अपूर्ण विमानतळाचं उद्घाटन केलं जात आहे. डिसेंबरमध्ये नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत, तरीही आता उद्घाटन करण्याचा अट्टाहास हा निवडणुकीतील राजकीय डाव आहे. मोदी आले आहेत तर शेतकऱ्यांसाठी भरघोस पॅकेज जाहीर करावं.”
चंद्रपूर आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया-
चंद्रपूरमधील शेतकरी आत्महत्येच्या घटनेबद्दल ते म्हणाले, “मी त्या संदर्भात ऐकले आहे, पण संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी त्यावर बोलेन.”
जरांगे पाटील यांच्यावर टीका-
जरांगे पाटील यांच्या राहुल गांधी संदर्भातील वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, “जरांगे अजून लहान वयातले आहेत. त्यांच्या बुद्धीनुसारच ते बोलतात. त्यांच्या बालिश वक्तव्यांवर जास्त प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.”
आरक्षणातून नोकरीबाबत संतुलित भूमिका-
जरांगे यांच्या “सर्वांना नोकऱ्या मिळाव्यात” या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, “नोकऱ्या सर्व समाजांना मिळायलाच हव्यात. पण दुसऱ्याच्या हक्काचा हिस्सा काढून घेणं योग्य नाही. सरकारकडून घ्या, पण आमच्या गरीब समाजाच्या ताटातलं काढून त्यांना उपाशी ठेवणं योग्य नाही.”