परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या अर्ज प्रणालीमधील खात्याची आधार आणि इतर पद्धतीने 'केवायसी' करणे अनिवार्य असणार आहे. प्रत्येक अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने 'केवायसी' पडताळणी केली नाही, तर त्याला अर्ज भरता येणार नाही. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.भरती प्रक्रियांच्या विविध टप्प्यावर उमेदवाराचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वेच्छा तत्त्वावर अधिप्रमाणीकरणाचा आधार वापर करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
राज्य सरकारकडून भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी सेवांसाठी स्वेच्छा तत्त्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यासाठी 'एमपीएससी'ला प्राधिकृत केले आहे.'एमपीएससी'च्या सूचनेनुसार उमेदवारांना आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपरआधारित केवायसी, नॉन आधार ऑफलाइन केवायसी या पद्धतीतून ओळख पडताळणी करावी लागणार आहे.
आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या उमेदवाराला मोबाइल; तसेच ई-मेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आधार आधारित ओळख पडताळणीच्या व्यवस्थेमुळे आधार क्रमांकाशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे.