पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका महिलेने पुण्यातच हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहित तरुणीने आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार पु्ण्यात समोर आला आहे. छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना शुक्रवारी रात्री हांडेवाडी रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी तिच्या सासू विरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती, सासू व नणंदेने छळ केल्याची तक्रार विवाहितेने कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारदार गर्भवती असतानाही पतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देऊन पोटावर लाथ मारल्याने गर्भपात झाल्याची तक्रार विवाहितेने केली आहे. दीपिका प्रमोद जाधव, वय 29 वर्ष, रा. हांडवाडी रस्ता, हडपसर, असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिची सासू द्वारका जाधव हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि क्रूर वागणूक देणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांच्या अनुसार काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपिकाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.