रायगड : आदिवासींच्या रस्ता पाण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने केले जल समाधी आंदोलन
भारत देश महासत्ता झाल्याच्या मोठमोठ्या बाता मारणारी सरकारी यंत्रणा स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही आदिवासींना रस्ते,पाण्यासारख्या मूलभूत सुविधा देऊ शकली नसल्याचे वास्तव वारंवार समोर येतेय. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी आदिवासी वाडीच्या निमित्ताने हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलेय. ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्यासह रस्ता देखील नाही. वाडीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील आदिवासी भगिनींना कधी दोन किलोमीटरवर असलेल्या शितोले वाडीतील दूषित तलावातील तर कधी पहाटे तीन वाजता उठून जंगलात सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खड्ड्यातून हंडाभर पाण्यासाठी मोलमजुरी सोडून पायपीट करावी लागत आहे. या मालवाडीतील आदिवासींची व्यथा इथेच संपत नाही तर या वाडीला आजही रस्ता नसल्याने वाडीच्या विकासाचा मार्गच जणू थांबला आहे. सुमारे दोनशे च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या माळवाडीसाठी दोन वर्षांपूर्वी जल जीवन मिशन योजनेतून सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांची योजना मंजूर अलिबाग येथील सुधाकर पाटील यांना ठेका देण्यात आला तर रस्त्यासाठी आता महिन्यांपूर्वी पेण येथील रामेश्वर कन्स्ट्रक्शन यांना ठेका देण्यात आला परंतु दोन्ही विकास कामे पूर्ण न केल्यामुळे मालवाडीतील आदिवासींवर मात्र रस्ता, पाण्यासाठी जल समाधी घेण्याची वेळ आली आहे.