पुणे : राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; हुंड्यात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार अन् चांदीची भाडी; तरीही सुनेचा अमानुष छळ

पुणे : राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; हुंड्यात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार अन् चांदीची भाडी; तरीही सुनेचा अमानुष छळ
  • MG News
  • मे 21 2025

Share on  

पुणे : राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; हुंड्यात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार अन् चांदीची भाडी; तरीही सुनेचा अमानुष छळ 

         पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे  हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणानंतर आता पुण्यात खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी वैष्णवीचा छळ केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पोलीस कारवाई करत आहेत. मात्र, वैष्णवीचे सासरे आणि नवरा अद्यार फरार असल्याने वैष्णवीच्या आई-वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. यावर वैष्णवी यांच्या आईने आणि मामाने देखील प्रतिक्रिया दिलीये.

दोन्ही आरोपी पाच दिवसांपासून फरार आहेत. या प्रकरणात नक्कीच राजकीय वरदहस्त असावा, असा संशय देखील वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केला. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. आमच्या लेकीला न्याय लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाची आठवण देखील करून दिली.

अजित पवार लग्नाला आहे होते, तेव्हा ते एक तास लग्नाला थांबले. लग्न लागल्यावर जेव्हा अजित पवारांनी आशीर्वाद द्यायला आले होते, तेव्हा अजित पवारांनी गाडीकडं बोट करुन म्हणाले होते की, यांनी मागितली की तुम्ही दिली. हगवने फॉर्च्यूनर गाडी तुम्ही मागितली होती की त्यांनी दिली? हे अजित पवाराचं वाक्य होतं, असा खुलासा देखील वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे.

माझ्या मुलीला मारत माहेरी आणलं तेव्हा नणंद आणि सासूने मारहाण केली. तिला मारलं तेव्हा मी स्वतः तिच्या नंदेचे पाय धरले, तरी देखील त्यांना दयामाया आली नाही, असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

माझ्याकडे 51 तोळ्याची मागणी केली होती. चांदीच्या भांड्याची मागणी केली. मी दुसरी गाडी बूक केली होती. पण सारखपुड्यानंतर पाहुणे म्हणाले की मला फॉर्च्यूनर पाहिजे. मी त्यांची ती मागणी देखील मान्य केली. त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या, त्या सगळ्या गोष्टी दिल्या. दिवाळीला अंगठी देखील केली, अशा मागण्या सातत्याने होत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन कोटी मागितले होते, असं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. अजित पवारांना आमचं एवढंच म्हणणं आहे की, त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला लवकरात लवकर न्याय द्या. तुम्ही आरोपींना पाठराखण करता कामा नये. तुम्ही लाडकी बहिण योजना राबवता. तुम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना न्याय मिळणार का? असा सवाल वैष्णवीच्या कुटूंबियांनी अजित पवार यांच्याकडे केला आहे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील यावेळी नातेवाईकांनी केली आहे.

संबंधित बातम्या