जिल्ह्यात रत्नागिरी तहसिल कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये मॉक ड्रिल्स पार पडल्या. सायरन वाजवून युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली गेली आणि प्रशासनाच्या तयारीची चाचणी घेण्यात आली.
या मॉक ड्रिल्सचे नेतृत्व नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांनी केले. यामध्ये आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका सेवा, आणि प्राथमिक उपचार यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्यात आली.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार नागरी संरक्षण सज्जतेसाठी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत या मॉक ड्रिल्सचे आयोजन करण्यात आले. मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक यांसारख्या महत्त्वाच्या कंपन्यांसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतींमधील महाविद्यालयांनीही मॉक ड्रिल्स घेतल्या असून त्याचे अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, “सर्व संबंधित यंत्रणांनी मॉक ड्रिलमध्ये प्रभावी सहभाग नोंदवला असून जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहे.”
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, “सुरक्षा व्यवस्थेची चाचणी वेळोवेळी होणे आवश्यक आहे. अशा मॉक ड्रिल्समुळे प्रशासन आणि नागरिक दोघांमध्ये सजगतेची भावना निर्माण होते.”