जर तुमची डी एड किंवा बी.एड झाली असेल आणि तुम्हाला शिक्षक होण्याचं स्वप्न असेल, तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे.
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती चालवणा-या शाळांमध्ये सध्या १२००० हून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. केंद्रीय विद्यालय संघटनेत सध्या ७७६५ पदे रिक्त आहेत, तर नवोदय विद्यालय समितीत ४३२३ पदे रिक्त असल्याचे केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले आहे. चला जाणून घेऊया की ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे.
राज्यमंत्री म्हणाले की या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार लवकरच भरती प्रक्रिया सुरू करणार असून, त्यासाठी आवश्यक तयारी केली जात आहे. त्यामुळे शिक्षक बनण्याची ही एक उत्तम संधी आहे.
राज्यसभेत शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी माहिती दिली आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) मध्ये ग्रुप-ए पदांसाठी सुमारे १४३ जागा रिक्त आहेत. तसेच, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेत (एनसीटीई) ६० पदे रिक्त आहेत, ज्यासाठी लवकरच भरती होणार आहे
केंद्रीय आणि नवोदय विद्यालयांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत माहिती देताना, त्यांनी सांगितले की या पदांची भरती एक सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे. सरकार या रिक्त जागा भरून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित भरती करत आहे.