नाशिक–पुणे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे व आमदार राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच व्हावा, यासाठी ठोस कारणांसह आग्रही भूमिका मांडण्यात आली. मूळ आराखड्यानुसार सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–मंचर–चाकण मार्ग अधिक व्यवहार्य, खर्चिकदृष्ट्या लाभदायी व नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी उपयुक्त असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर–शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग वळविण्याचा प्रयत्न होत असला तरी GMRT केंद्रामुळे पर्यायी आराखडा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. मूळ मार्ग नाशिक, पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या औद्योगिक व कृषी विकासाला गती देणारा ठरेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
आमदारांच्या या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाबाबत ठाम भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. तसेच केंद्र शासन व संबंधित मंत्रालयाशी समन्वय साधून लवकरात लवकर निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.