पुणे रेल्वे स्थानक परिसरात रविवारी पहाटे रिक्षाचालकाने दोन साथीदारांसह प्रवाशावर हल्ला करून जबरी चोरी केली. त्यांनी प्रवाशाकडून २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला.
या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी विजय माने (वय २४, रा. नवी मुंबई) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्थानक ते वानवडी या प्रवासात पहाटे सव्वातीन ते चारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर तक्रारदार तरुण रिक्षाची वाट पाहत होता. त्या वेळी एका रिक्षाचालकाने त्यांच्याजवळ येऊन 'मी सोडतो.' असे सांगून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्या वेळी रिक्षात आणखी दोघे जण होते. तरुण त्या रिक्षात बसला. पुढे टर्फ क्लब रेसकोर्समार्गे भैरोबा नाल्याच्या दिशेने जात असताना रिक्षाचालकाने दोन अनोळखी साथीदारांसह अचानक त्यांच्या अंगावर हल्ला केला. त्यांनी तरुणाचे दोन्ही हात पकडून त्याच्या खिशातील मोबाइल, अंगठी, सोन्याची बाळी आणि रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर हे तिघे रेल्वे स्थानकाच्या दिशेने रिक्षातून फरार झाले. तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळेला रिक्षाचालकांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस आरोपींचा माग काढत असून, गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरी घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) वडगाव पुलाजवळ घडली. सूरज बाळासाहेब दरेकर (वय ३०) त्यांच्या मेव्हण्यासह रस्त्याने जात असताना तिघा अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी विनाकारण वाद घालून झटापट केली. त्या वेळी त्यांनी दरेकर यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.