संजय राऊत यांची सरकारवर झोड – “शेतकरी पाण्यात, सरकार क्रिकेटमध्ये व्यस्त”

संजय राऊत यांची सरकारवर झोड – “शेतकरी पाण्यात, सरकार क्रिकेटमध्ये व्यस्त”
  • MG News
  • सप्टेंबर 28 2025

Share on  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे हाल, सरकारची निष्क्रियता आणि भारत-पाक सामना तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील हस्तक्षेप यावर भाष्य केले.

 मराठवाड्यातील पुरस्थिती व सरकारवर टीका:

महाराष्ट्रात तुफानी पावसामुळे गंभीर संकट निर्माण झाले असून, शेतकरी दहा-दहा दिवसांपासून पाण्यात व चिखलात अडकलेले आहेत. अनेकांना चार दिवस अन्न-पाणी मिळालेले नाही, घरे वाहून गेली, निवारा नाही. तरीदेखील सरकारकडून मदतीची गती फारच मंद आहे. राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ मुंबई-नागपूरमध्ये काय करत आहेत? त्यांनी संभाजीनगर, लातूर, नांदेडला जाऊन शेतकऱ्यांच्या सोबत थांबले पाहिजे होते. मात्र, सरकार क्रिकेट निवडणुकीत आणि आयपीएलच्या बंदोबस्तात अडकले आहे.” शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार फोटो काढण्यात आणि कार्यक्रमात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी मागणी केली की, पूरग्रस्त जिल्ह्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पालकमंत्री जिल्ह्यातच बसून मदतकार्य सुरू ठेवावं.

भारत-पाक सामना व पीव्हीआरवरून संताप:

संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या प्रक्षेपणावरून सरकारवर हल्लाबोल केला. “रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये सामना दाखवणाऱ्यांना संरक्षण दिलं जातं, पण शेतकऱ्यांना काहीच संरक्षण नाही. हे सरकार निर्लज्ज आहे,” अशी टीका त्यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले, “जर पीव्हीआरमध्ये भारत-पाक सामना दाखवला जात असेल, तर त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. सामना पाहायला जाणाऱ्यांचा डीएनए चेक करावा लागेल.” राऊत यांचा आरोप होता की, भारत-पाक सामन्याच्या सट्ट्यात लाखो कोटी रुपये फिरत असून त्यातील मोठा हिस्सा पाकिस्तानपर्यंत जातो.त्यांनी व्यंगात्मक भाषेत म्हटलं की, “जय शहा आणि अमित शहांचा गौरव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने करावा.”

सरकारच्या निष्क्रियतेवर थेट प्रश्न:

“किती लोकांना मदत केली, याचा हिशोब देऊ शकता का? खाजगी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते मदत करत आहेत, पण सरकारने काहीही केलं नाही,” असा आरोप त्यांनी केला.पालकमंत्र्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, “दोन टेम्पो घेऊन फोटो काढले आणि आता ते दिसत नाहीत. अशा कामचुकार मंत्र्यांना बडतर्फ केले पाहिजे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मराठवाडा दौरा करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशीही त्यांनी मागणी केली.

दसरा मेळाव्याबाबत भूमिका:

शिवसेना (उबाठा) चा पारंपरिक दसरा मेळावा शिवतीर्थावर होणारच, असे राऊत यांनी स्पष्ट केले. “पाऊस, वारा, वादळ काहीही असलं तरी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होतील. शेतकरी १० दिवस पाण्यात आहे, तर आपण दोन तास चिखलात बसलो तरी काही बिघडणार नाही,” असे ते म्हणाले.

 संजय राऊत यांचा थेट संदेश:

“हे सरकार कामचुकार, निर्लज्ज आहे. क्रिकेटसाठी संरक्षण आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही. महाराष्ट्र संकटात आहे, पण सत्ताधारी सत्तेच्या खेळात व्यस्त आहेत. ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा, अन्यथा आम्ही लोकांच्या सोबत रस्त्यावर उतरू.”

संबंधित बातम्या