शिरपूर: किराणा दुकानफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर: किराणा दुकानफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

शिरपूर शहरातील मारवाडी गल्ली येथे असलेल्या "ताराचंद श्विलाल अँड कंपनी" या होलसेल किराणा दुकानाचे शटर तोडून १७ ते १८ मे २०२५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ₹४,०६,८९५ किमतीचा किराणा माल चोरून नेला होता. या प्रकरणी निलेश ताराचंद डागा (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू करत गुप्त माहितीच्या आधारे वाहिद हसन सिद्दीक (रा. मालेगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला माल पाचोरा (जि. जळगाव) येथे सदाशिव पाटील यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले. सदर ठिकाणी छापा टाकून पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपासात आरोपी वाहिद याचे साथीदार, आसिफ टेलर उर्फ आसिफ इकबाल, इमरान उर्फ बांड्या कुरेशी व सोनू उर्फ सय्यद हुसैन (सर्व रा. मालेगाव) यांचाही सहभाग उघड झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मालात तेलाचे डबे, दाळी व तांदूळ यांचा समावेश असून एकूण रक्कम ₹४,०६,८९५ इतकी आहे. आरोपींच्या विरोधात पूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पो.नि. परदेशी, पो.उ.नि. सुरेश सोनवणे व गुन्हे शोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. तपास पुढे सुरू असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित बातम्या