शिरपूर तालुक्यात महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावा, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी मंडलिक यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले.
“महसूल विभाग हा अपत्ती व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया किंवा इतर तातडीच्या कामांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम करणारा विभाग आहे. इतर शासकीय विभागांशी समन्वय साधत महसूल विभाग सतत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे,” असे मंडलिक म्हणाले.
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यात शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे, दाखले वाटप, जनजागृती शिबिरे व इतर लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.