‘शिवसैनिकांना अटक,आंदोलनाची भीती; गृहमंत्र्यांनी असं वागू नये’- संजय राऊत

 ‘शिवसैनिकांना अटक,आंदोलनाची भीती; गृहमंत्र्यांनी असं वागू नये’- संजय राऊत
  • MG News
  • ऑक्टोबर 5 2025

Share on  

देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीवर टीका करत खासदार संजय राऊत यांनी आज तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.
राऊत म्हणाले, “त्याला गुप्त बैठक म्हणता येणार नाही, पण जर तिघांमधील भांडण मिटवायचे असतील तर ती बंद दाराआडच मिटवता येतील. देशाचे गृहमंत्री निधड्या छातीचे आहेत, मुंबईत शिवसेनेशी दोन हात करणारे आहेत. मात्र, आता त्यांना महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटतेय.”

राऊत पुढे म्हणाले, “अमित शाह नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेना, मनसे आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, नोटिसा बजावण्यात आल्या. तुम्हाला लडाखमधील सोनम वांगचुकची भीती वाटते, मणिपूरमधील महिलांची भीती वाटते, आणि महाराष्ट्रातील शिवसैनिकांची भीती वाटते .  तुम्ही देशावर राज्य करताय, पण तुम्हाला भीती कसली?”

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना येऊ देणार नाही, आंदोलन थांबवणार, असा पळकुटेपणा राजकारणात शोभत नाही. आंदोलन करणं लोकशाहीचा अधिकार आहे. मंत्र्यांच्या गाड्या अडवून प्रश्न विचारणं ही परंपरा आहे; मुंबईत मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या गाड्या देखील लोकांनी अडवल्या होत्या. पण आज सरकार लोकांचा आवाज दाबतंय.”

देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत राऊत म्हणाले, “फडणवीस देखील लोकांना अटक करून तुरुंगात टाकत आहेत. तुम्ही गृहमंत्री आहात, तर तसे वागा लोकशाहीत भीती आणि दडपशाहीसाठी जागा नाही.”

‘राणेंनी आपल्या मुलांना आवरावे’: 
नितेश राणे यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “अनिल परब हे कायद्याचे जाणकार आहेत, त्यांनी विचारलेले प्रश्न गंभीर आहेत. नारायण राणे यांनी आपल्या मुलांना आवरलं पाहिजे. सत्ता येते-जाते, पण लोक तुमच्यावर थुंकल्या शिवाय राहणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात अपमानजनक बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. हे निर्लज्ज आहेत.”

नवी मुंबई विमानतळावरील आंदोलनाची घोषणा:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाबाबत बोलताना राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी येणार असले तरी मराठी माणसांना तिथे स्थान नाही. भुमिपुत्रांना काहीही मिळत नाही. या अन्यायाविरुद्ध आम्ही आंदोलन करणार असून, उद्धव ठाकरे स्वतः त्या आंदोलनाचं नेतृत्व करतील. शिवसेना आणि शेकाप दोन्ही पक्ष जमिनीवर उतरतील.”

संबंधित बातम्या