परभणी जिल्ह्यात एसटी बस आणि दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृ्त्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परभणीच्या पाथरी-सोनपेठ मार्गावरील जैतापूर वाडीजवळ आज बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी ही बसच्या समोरील भागात अडकून अनेक फूट फरफटत गेल्याचं पाहायला मिळत आहे.
पाथरी सोनपेठ रस्त्यावर जैतापूर वाडीजवळ या बसला अपघात झाला. त्यावेळी समोरून पाथरीकडे येणाऱ्या दुचाकी क्र. एम. एच. २२ ए.के. १५८३ आणि बस क्र. एम. एच. ०६ एस ८७९० ची जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील लतिफ अहमद पठाण (वय ५६) आणि शेख अनवर शेख नूर (वय ३९ वर्षे) राहणार इंदिरानगर हे दोघेही जागीच ठार झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढच्या भागात दुचाकी अडकला जाऊन बससोबत दुचाकी फरफटत पुढे गेली होती. अपघात होताच बस रस्त्याच्या कडेला एका शेतात जाऊन थांबली. सुदैवाने बस मधील कोणाला मार लागला नाही, पण दुचाकीवरील दोघांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.