गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला गावातील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी शिक्षक विरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली. आरोपी शिक्षकांची रवानगी भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तर संस्था चालक आणि मुख्याध्यापकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय आरोपी शिक्षक शामराव देशमुख राहणार कोहमारा याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ६४,६५, ७५,१८१ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो तसेच बाल न्याय अधिनियम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर शिक्षकाने वर्ष २०२३ पासून २०२५ या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाइन क्रमांक १०९८ वर करण्यात आली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने १८ जुलै ला डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली तर २१ जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शाळेतील मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि संस्थाचालक रामकुमार गजभिये यांना हे प्रकरण माहिती असताना सुद्धा त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.