दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन गटांमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला आहे.
ही घटना सकाळी १० ते ११ च्या सुमारास घडली. एका युवकाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात वातावरण तापले. या पोस्टवरून दोन्ही गट आमने-सामने आले असून, संतप्त जमावाने दगडफेक केली. आणि गावात ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले.
पोस्ट करणाऱ्या युवकाच्या घरावर देखील जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. गावात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या संपूर्ण गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासन नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत आहे.