सातपुर गोळीबार व अंबड खंडणी प्रकरणातील सराईत आरोपी अखेर जेरबंद; अंबड गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

 सातपुर गोळीबार व अंबड खंडणी प्रकरणातील सराईत आरोपी अखेर जेरबंद; अंबड गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी
  • MG News
  • ऑक्टोबर 20 2025

Share on  

नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंबड गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. सातपुर गोळीबार प्रकरण आणि अंबड खंडणी प्रकरणातील पाहीजे असलेला सराईत आरोपी निखीलकुमार मधुकर निकुंभ (वय ४१, रा. डी.जी.पी. नगर-३, खुटवडनगर, नाशिक) यास मिरा भाईंदर, ठाणे येथून जेरबंद करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त मा. संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर पोलीस दलातील अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेच्या पथकातील पोअं. भगवान जाधव आणि पोना. भुषण सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी मिरा रोड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई केली.

अंबड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जाऊन केन वुड टॉवर, मिरा रोड (पूर्व) परिसरात सापळा रचला आणि १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची सखोल चौकशी व पडताळणी केली असता त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.


आरोपी निखीलकुमार निकुंभ हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहीजे असून, त्याने नाशिक शहरात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण आणि अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक केल्यानंतर त्यास पुढील कारवाईसाठी सातपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या यशस्वी कारवाईत सहभागी अधिकारी:

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मिटके, व अंबड विभाग प्रमुख श्री. शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वपोनि. नवेंद्रसिंग राजपुत, पोउनि. मोतीलाल पाटील, श्रे.पोउनि. दिलीप सगळे, सपोउनि. सुहास क्षिरसागर, पो. हवा. प्रकाश बोडके, पो.ना. भुषण सोनवणे, पो.अं. भगवान जाधव, चारूदत्त निकम, आणि मपोअं. सविता कदम यांनी मोलाचे योगदान दिले.
तसेच मसपोनि तारडे मॅडम आणि त्यांच्या तांत्रिक विश्लेषण पथकाचे विशेष सहकार्य लाभले.

अंबड गुन्हे शाखेच्या या तडाखेबंद कारवाईमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसला असून, पोलीस दलाच्या दक्षतेचे आणि शिताफीचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे.

संबंधित बातम्या