कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय. या सागर किनार पट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यांवर अवलंबुन असते. याचं उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या पुढाकाराने सबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता. मात्र, अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येतेय.
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकीच एक. याठिकाणी असलेला ६ किमी चा बंधारा आता पूर्णपणे उध्वस्त झालाय, बंधाऱ्याचे दगड गोटे निखळून पडलेत, झाडें उन्मळून पडली आहेत, मातीची मोठी धूप झालीय, अशातच उधान आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने ही पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावतेय. पावसाळ्यात तर गावकऱ्यांच्या मनातील भीती अधिक गडद झालीय, किनार पट्टीवरील नागरिक, रिसॉर्ट मालक, व्यवसायिक भयभीत झालेत. कर्मभूमीची अवस्था बघवत नसल्याचे येथील तरुण सांगतायत, आम्ही या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून देखील सरकार, मंत्री, प्रशासन लक्ष देत नाही. येथील पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या विहिरी धोक्यात आल्या असून, भविष्यात बंधारे नष्ट झाले, पर्यटन संपले तर गावकऱ्यांचे जीवन व पोट कसे भरणार? हा प्रश्न सतावतोय. बॅरिस्टर अंतुलेंच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण? असा सवाल किनार पट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
बंधाऱ्यामुळे जमिनीची धूप थांबते, सागराचे अतिवेगवान प्रवाहाचे पाणी बंधाऱ्यावर धडकून शांत होते. तुफान वादळी वाऱ्यात, अतिवृष्टीत देखील पाण्याच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचे काम बंधारा करतो. मात्र, किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते. सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीत शिरते. येथील पिण्याच्या पाणी साठ्यात खारे क्षार मिसळून पाणी खारट होते. सुरुचे घनदाट बन उध्वस्त होतात. शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय, असे असताना सरकार या महत्वपूर्ण समस्येकडे लक्ष देत नाही. त्यामुळे येथील रहिवाशी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
यावेळी डॉ. सचिन राऊळ म्हणाले की, सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागाव समुद्र किनाऱ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. कारण येथील बंधारा पूर्णपणे नामशेष झाला आहे. सागराच्या वेगवान प्रवाहाने बंधारे उध्वस्थ झाली आहेत. ४० ते ५० वर्षांपूर्वीची झाडे उन्मळून पडत आहेत. रायगड जिल्ह्यातील अनेक समुद्र किनाऱ्या वरील बंधारे काही अशी सुस्थितीत आहेत. मात्र, नागाव बंदर भुईसपाट झाले आहे, उधानाचे पाणी गावात शिरण्याची भीती वाढली आहे. कोणीही या समस्येकडे लक्ष देत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.