अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपूल बांधकामाला सव्वासात वर्ष पूर्ण झालेले आहेत, पण अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही. प्रशासनाचा वेळकाढूपणा याला कारणीभूत ठरला. त्यामुळे माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती, यात प्रधान सचिवांना व्यक्तिशः एक लाख रुपये दंड सुनावला. अमरावती शहरातील चित्रा चौक, इतवारा बाजार हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे.
अमरावती शहराच्या पश्चिम भागात राहणार्या सुमारे ५० ते ६० हजार नागरिकांना पूर्व-उत्तर-दक्षिण भागाशी संपर्काचा एकमेव मार्ग आहे. आता खंडपीठाने बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे. कामाचा प्रगती अहवाल दरमहिन्याला सादर करण्याचे बंधनही घातले आहे. ठरवून दिलेल्या अवधीत जर उड्डाणपूल पूर्ण झाला नाही, तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालविण्याची तंबी न्यायालयाने दिलेली आहे, त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशानंतर वेळेत काम पूर्ण होणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.