एकिकडे सरकारकडे निधी नसल्याने, लाडकी बहिण योजनेचे पैसे देण्यासाठी सरकार तारेवरची कसरत करत असताना, महायुतीचे मंत्रीच सरकारचा महसुल पळवत असल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसापुर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलगा सिद्धार्थ याचावर एका महिलेने गंभीर आरोप केले असतानाच, याच सिद्धार्थ यांनी २०० कोटी बाजारमुल्य किंमतीचे छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल अवघ्या ६४ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे उघड झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लिलावात काढलेल्या, या हॉटेलची रक्कम शायकीय महसुलात समाविष्ट होणार होती.मात्र बाजरमुल्यापेक्षा तब्बल 136 कोटी कमी रुपयात हॉटेल खरेदी केल्याने शासनाचा हा महसुल बुडाला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्थानक मार्गावर अत्यंत महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी वेदांत हॉटेल आहे. वेदांत हॉटेल आणि बाजूचा भूखंड ही धनदा कॉर्पेरेशनची मालमत्ता होती. शेअर बाजार नोंदणीकृत असलेल्या या कंपनीने शेकडो ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मालमत्तेचा ई-लिलाव करण्यात आला.
त्यात वेदांत हॉटेलसाठी मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलाच्या मालकीच्या मेसर्स 'सिद्धांत' मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लाय कंपनीने हॉटेल इमारत आणि जलतरण तलावासाठी 47 कोटी 56 हजार 749 रुपयांमध्ये सर्वोच्च बोली लावली. तसेच लॉनसाठी 17 कोटी 82 लाख 66 हजार रुपयांची बोली देखील लावली. त्यानंतर एकूण 64 कोटी 82 लाख रुपयांना हे हॉटेल आणि लॉन सिद्धांत शिरसाट यांच्या मालकीचे झाले. मंत्रीपुत्रानेच शासकीय महसुलात घट केल्याने महायुतीचा खरा चेहरा उघड झाला असल्याचे या निमित्त्याने बोलले जात आहे.