काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. खासगी गाड्यांवर आमदारांचे स्टिकर लावणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी “असा प्रकार तमाशा म्हटला तरी वावगे ठरणार नाही,” असे म्हटले.
डिफेंडर प्रकरणावर टीका-
सपकाळ म्हणाले, “मी स्वतः आमदार होतो, पण कधीही माझ्या गाडीवर स्टिकर किंवा बिल्ला लावला नाही. आज मात्र खासगी गाड्यांवर आमदारांचे स्टिकर लावले जात आहेत. मागच्या काळात ‘५० खोके एकदम ओके’ हा नारा होता, आता दिवाळीनंतर २१ आमदारांना एका ठेकदाराने डिफेंडर गाड्या भेट दिल्या आहेत. या २१ आमदारांची नावं आणि ठेकेदार कोण आहे, हे महाराष्ट्राला लवकरच समजेल. त्यातील एक गाडी बुलढाण्यात आहे.”
१ नोव्हेंबरच्या सर्वपक्षीय मोर्चाबाबत-
ते पुढे म्हणाले, “१ तारखेचा मोर्चा हा सर्वपक्षीय आहे. मतदार याद्यांचा मुद्दा गंभीर असून, आयोगाने याद्या अद्यावत कराव्या आणि मतांची चोरी थांबवावी हीच मागणी आहे. आयोगाने जे झोपेचे सोंग घेतले आहे, त्यातून त्यांनी जागे व्हावे. जर फ्री अँड फेअर निवडणूक घेतली नाही, तर नागरिकांनी सुद्धा यात सहभागी व्हावे.”
या मोर्चाला काँग्रेसचे समर्थन असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, “हा मुद्दा सर्वप्रथम राहुल गांधींनी देशासमोर आणला होता.”
संजय राऊत व लोकशाही संदर्भात भूमिका-
सपकाळ म्हणाले, “संजय राऊत यांच्याशी कोणताही वाद नाही. इतिहास तपासला पाहिजे की कोण लोकशाही आणि संविधानाच्या बाजूने उभा राहिला. भाजपा नेहमीच संविधानिक मूल्यांच्या विरोधात राहिली आहे. मुंबई वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस लढत राहील.”
वोट चोरी व राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया-
“वोट चोर, गद्दी चोर हा नारा काँग्रेसने आधीच दिला होता. जर इतर पक्ष वोट चोरीच्या मुद्द्यावर आवाज उठवत असतील, तर तो त्यांचा अधिकार आहे,” असे ते म्हणाले. “निवडणूक आयोगाचा कारभार वठणीवर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण’वर उपरोधिक टीका-
“मागच्या दिवाळीला लाडक्या बहिणींचा पुळका आला होता. पण यंदा त्या बहिणींचा विसर पडला आहे. लाडकी बहीण आता सावत्र बहीण झाली आहे, आणि पुढच्या दिवाळीला कोणती बहीण असणार हे पाहणे कुतूहलाचं ठरेल,” असे सांगत त्यांनी फडणवीस सरकारवर उपरोध केला.
“हे सुलतान फडणवीस नसून सुलतान फसनवीस आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.