आयपीएल 2025 चा फायनल सामना आज 3 जून रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा खेळवण्यात येणार असून पंजाब आणि आरसीबी हे दोन्ही संघ आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी प्रयत्न करतील. पंजाब किंग्स आणि आरसीबी हे संघ आयपीएलच्या सुरूवातीपासून या स्पर्धेचा भाग आहेत. मात्र त्यांना आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. तेव्हा पंजाब आणि आरसीबी पैकी यंदा कोणता संघ त्यांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोड्यावेळापूर्वी अहमदाबादमध्ये पाऊस सुरु झाल्याची बातमी समोर आली होती. भिजण्यापासून वाचण्यासाठी सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक रस्त्याच्या कडेला आडोसा शोधताना दिसत होते. मात्र आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचू लागेल आहेत.
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर आणि आरसीबीचा माजी खेळाडू क्रिस गेल हा आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात होणारा फायनल सामना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. आरसीबी २००९ , २०११ आणि २०१६ नंतर चौथ्यांदा आयपीएल फायनलला पोहोचली आहे.