दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे. मळगाव-रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली १५० हून अधिक वर्षे ही दीड दिवसाची नागपंचमी साजरी होत आहे. विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाला विशेष अशी ओळख आहे. पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. विशेषतः कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मातीच्या नाग प्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी ५ च्या सुमारास अळवाच्या पानावर विसर्जन केले जाते. मात्र, मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फणांची प्रतीमा पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही सुरू आहे.