राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. स्थानिक स्वराज्य निवडणुका, उद्धव ठाकरे यांचा निर्णय, गौतमी पाटील प्रकरण, रोहित पवारांचे वक्तव्य तसेच सांगली-कोल्हापूरमधील आगामी पक्षप्रवेश या सर्व विषयांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
स्थानिक स्वराज्य निवडणुका:
पाटील म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सर्व याचिका आता कोर्टाने निकाली काढल्या आहेत.” “न्यायालयाने थेट निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर महायुतीचं वर्चस्व असलं पाहिजे.”
“जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्ण होताच आम्ही महानगरपालिकेसाठी तयारी सुरू करू.”
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका:
“२०१४ ते २०१९ या काळात आम्ही उद्धव ठाकरे यांना खूप सन्मान दिला. मात्र त्यांनी आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली.”
“केवळ मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. ही बाब आम्हाला खंत वाटणारी आहे.”
“आता उद्धव ठाकरे आमच्यासोबत असायला पाहिजेत, असा काही प्रश्नच नाही.”
गौतमी पाटील प्रकरण:
माध्यमांत गाजलेल्या गौतमी पाटील प्रकरणाविषयी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की ; “गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षावाल्याला धडक दिल्याचा आरोप झाल्यानंतर माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर बातम्या लावल्या.”
“त्या रिक्षा चालकाची मुलगी माझ्या ऑफिसला आली होती. त्यानंतर मी स्वतः डीसीपींना फोन केला.”
“तपासात समोर आले की, संबंधित गाडीत गौतमी पाटील अजिबात नव्हत्या.”
रोहित पवारांवर जोरदार पलटवार:
“रोहित पवार यांना नक्की काय कामधंदा आहे, हेच कळत नाही.”
“थोडी तरी पत राखून त्यांनी बोललं पाहिजे.”
“मला काय करायला हवं हे रोहित पवारांनी शिकवायची गरज नाही.”
“आम्ही कोणत्या प्रकरणात काय भूमिका घेतो हे ढोल वाजवून सांगायची आमची पद्धत नाही.”
सांगली-कोल्हापूरमध्ये मोठे पक्षप्रवेश:
“सांगली जिल्ह्यात शरद लाड यांचा मंगळवारी पक्षप्रवेश होणार आहे.” “कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत मोठे पक्षप्रवेश होणार असून, आज संध्याकाळपर्यंत कोल्हापुरातील प्रवेश करणाऱ्या मोठ्या नेत्याचे नाव समोर येईल.” “शरद लाड यांनी पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यांचे वडील विद्यमान आमदार असल्यामुळे आणि मतदारांची मोठी नोंदणी असल्यामुळे हा दावा मजबूत ठरतो.”
कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी:
“मी कोल्हापुरातून कधीच लक्ष काढून घेतले नाही.”
“पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी पार पाडतो.”
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे.”
बाळासाहेब ठाकरे हातांचे ठसे प्रकरण:
या वादग्रस्त प्रकरणावर पाटील म्हणाले,“मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे या विषयावर मी कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.”
चंद्रकांत पाटील यांच्या या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महायुती आक्रमक पवित्रा घेणार आहे. तसेच उद्धव ठाकरे, रोहित पवार यांच्यावरील त्यांच्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.