धुळे तालुक्यातील आर्णी गावात अवकाळी पावसाचाकहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
धुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे धुळे तालुक्यातील आर्णी गावात चार घरांचे पत्रे उडून गेले असून घरांतील अन्नधान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कालपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण होते. सायंकाळी ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यांसह आज पहाटेच्या पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार ओढवला आहे. धुळे तालुक्यातील आर्णी गावातील गणेश भील, बन्सीलाल भील, शामराव भील आणि नंदू भील यांच्या 'घरकुल योजने' अंतर्गत मंजूर झालेल्या घरांची पत्रे या वादळात उडून गेली. वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की उडून गेलेली पत्रे जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावर जाऊन पडली. याशिवाय, गावात आणखी एका झोपडीवर झाड कोसळल्याने त्या झोपडीतील सगळ्या वस्तूंचे नुकसान झाले. सुदैवाने झोपडीमध्ये कोणीही उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली.