कुडाळ आणि वेंगुर्ला तालुके जोडणारा वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी-तेंडोली हा ६ किमी अंतराचा रस्ता पूर्णतः खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे. यामुळे ये-जा करणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या डागडुजी आणि डांबरीकरणाबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिलीत. मात्र, आजपर्यंत या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे.
वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी हा ६ किमी अंतराचा हा रस्ता १८ वर्षांपूर्वी बनविण्यात आला. मात्र, त्यानंतर या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने ढुंकूनही बघितले नाही. यामुळे हा रस्ता खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे. या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून डबकी बनली आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तर आदोसेवाडी येथील विद्यार्थी वर्गाची वेतोरे हायस्कूलमध्ये जाताना मोठी दमछाक होते. त्यामुळे गणपती सणापूर्वी या रस्त्यातील खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच नागरिकांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.