मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्याने मंगळवारी भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांत १ टक्क्याहून अधिक घसरगुंडी दिसून आली. परिणामी ‘सेन्सेक्स’ची ८१,००० अंशांची पातळी मोडीत निघाली.
मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण होऊन,मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,०६४.१२ अंशांची घसरण झाली आणि तो १.३० टक्क्यांनी घसरून ८१ हजारांखाली ८०,६८४.४५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने १,१३६.३७ अंश गमावत ८०,६१२.२० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३३२.२५ अंशांनी म्हणजेच १.३५ टक्क्यांनी घसरून २४,३३६ पातळीवर बंद झाला.