ट्रक च्या धडकेत महिला डॉक्टर ठार:

ट्रक च्या धडकेत महिला डॉक्टर ठार:
  • MG News
  • जानेवारी 10 2025

Share on  

पुणे : भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वार महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे (एमएच १७ केजी ९७८६) चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास उंड्री हांडेवाडी रस्त्यावर घडली. धक्कादायक म्हणजे ट्रक चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून महिलेचे रक्त लागलेला टायर बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र तितक्यात पोलिसांनी त्याची गचांडी धरली.

मृत महिला व्यवसायाने डॉक्टर होती. त्यांचे उंड्री परिसरात क्लिनिक होते. अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

डॉ. प्रणाली तन्मय दाते (वय ३४, रा. व्हीटीपी अर्बन को-ऑपरेटिव सोसायटी, कानडे शोरूम शेजारी, उंड्री) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले (वय ३५ रा. तुळजापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपघाताचे स्पष्टीकरण -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास डॉ. दाते घरातून हांडेवाडीच्या दिशेने निघाल्या होत्या. त्या वेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर डॉ. दाते रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना अपघाताची माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. डॉ. दाते यांच्या पश्चात त्यांचे डॉक्टर पती आणि एक मुलगा असा परिवार आहे.
गुन्हा लपवण्याचा प्रयत्न-
फरारी झालेल्या ट्रक चालकाने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. अपघात स्थळापासून दूर अंतरावर जाऊन ट्रक चालक ट्रकचे चाक बदलत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले. ट्रकच्या चाकाला महिलेचे रक्त लागले होते. त्या गोष्टीचा अडथळा नको, म्हणून ट्रक चालकाने टायर बदलण्याचा मार्ग निवडला. मात्र, त्याच वेळी पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी त्याला ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या