गणेशोत्सव जवळ येत असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कापसे फाउंडेशनच्या महिला कारागीर शेणापासून गणपतीमूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक गणपती तयार करणे आणि निसर्ग संवर्धनाला चालना देण्याबरोबर महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे. कापसे फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे.
महिलांनी शेण, माती, कागदाच्या लगद्याचा वापर करून छोट्या आणि मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती घडवायला सुरुवात केली आहे. शेण व इतर नैसर्गिक साहित्याच्या वापरामुळे या मूर्तींच विघटन कमी कालावधीत होतं आणि विसर्जनानंतर जलस्रोतांना हानी पोहचत नाही. या मूर्ती बनवताना कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंग, हळद, गेरू, कोळशाची भुकटी अशा पर्यावरणास हितकारक घटकांचाच वापर केला जातो. गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतानाच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम येवल्यातील कापसे फाउंडेशनने हाती घेतला आहे.