कुंभमेळ्यासाठी सेवा मित्र म्हणून युवकांनी पुढे यावे :- जिल्हाधिकारी जलज शर्मा

कुंभमेळ्यासाठी सेवा मित्र म्हणून युवकांनी पुढे यावे :- जिल्हाधिकारी जलज शर्मा
  • MG News
  • सप्टेंबर 14 2025

Share on  

 कुंभमेळ्याच्या वेळी विविध कार्यासाठी सेवा भारतीच्या माध्यमातून युवकांनी सेवा मित्र म्हणून सहभाग नोंदवावा व येणाऱ्या भाविकांना नाशिकचा कुंभ हा कायमस्वरूपी लक्षात राहील यासाठी सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  जलज शर्मा यांनी  केले. 
      सेवा भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनासंबंधाने १८ ते ४५ या वयोगटातील स्त्री पुरूषांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन भोसला मिलिट्री काॅलेज येथे आज रविवार दि.१४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी  जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
        सेवा‌ भारती नाशिकचे विभाग संयोजक श्री.अरविंदराव जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सर्वांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री.शैलेंद्रजी बोरकर यांनी सांगितले कि, सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध प्रकारची ५२५ पेक्षा जास्त सेवा कार्ये सुरू आहेत. शिक्षण, आरोग्य याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही ही संस्था कार्यरत आहे. कुठलीही आपत्ती आली कि सर्वप्रथम धावून जाणारा संघाचा स्वयंसेवकच असतो. आपत्ती ही सांगून येत नाही. त्यासाठी मदत करण्याची मानसिक तयारी असावी व त्याची शास्त्रशुद्ध माहिती असावी यासाठी आजच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थिंचा समाजाला निश्चित उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
        महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी नाशिक येथे होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन स्तरावर सूरू असलेल्या तयारीची माहिती देऊन सेवाभावी वृत्तीने व समर्पित वृत्तीने समाजातील सेवा देणा-या व्यक्ती व संस्था यांची मदत लागणार असल्याचे सांगितले. समाजात नि:स्पृहपणे कार्यरत असणा-या सेवा भारतीने आज या वर्गाद्वारे प्रशिक्षित स्वयंसेवकांची टीम तयार करण्याचे हाती घेतलेले काम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
       यावेळी व्यासपीठावर रा.स्व. संघाचे प्रांत सेवा प्रमूख श्री.शैलेंद्रजी बोरकर, सेवा भारतीचे आपत्ती प्रबंधन प्रमूख श्री.सदानंदजी कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.गिरीशजी महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव , शहर संघचालक डाॅ.मालपाठक, सेवा भारतीचे श्री.वाघ व उपाध्यक्षा डाॅ.पूनम शिवदे हे मान्यवर उपस्थित होते.
       प्रत्यक्ष प्रशिक्षण देणेसाठी नागरी संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ श्री.श्रीकृष्ण पाटील व आपत्ती व्यवस्थापनाचे नवी दिल्ली येथील प्रशिक्षक श्री.राहूल पोखरकर हे उपस्थित होते. या प्रशिक्षणात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण व मालेगांव या भागातील २७५ प्रशिक्षणार्थिंनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणांतर्गत सकाळच्या सत्रात आपत्तींचे प्रकार,‌ धोके, प्रथमोपचार, आगींचे प्रकार व अग्निशामके यावर व्याख्यान देण्यात आले. तसेच दुपारच्या सत्रात उंचावरील जखमींना सुखरूप बाहेर काढणे, अपघाताच्या वेळेस करावयाचे प्रथमोपचार, तसेच कृत्रिम श्वसन (सीपीआर) यासंबंधाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी नाशिक महापालिकेचे अग्निशमन अधिकारी श्री.बैरागी सर व त्यांची टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
       श्री.सदानंदजी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी तयार करून येणा-या सिंहस्थ पर्वामध्ये सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने प्रशासना बरोबर हातात हात घालून येणा-या भाविकांना उत्तम सेवा देण्याची ग्वाही दिली. प्रशिक्षणाचे आयोजन काही सेवा भारती, नाशिकच्या श्रीमती.रत्नाताई पेठे , श्री.राजेंद्रजी अत्रे , श्रीमती. सीमाताई  गोसावी , श्री. बाळासाहेब चिंचोरे आदि मान्यवर, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
 

संबंधित बातम्या