शासनाच्या 1027 सेवा 15 ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरून - संजय काटकर
राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या 1027 अधिसूचित सेवा या ऑनलाईन दिल्या जातात. या सर्व सेवा वेगवेगळ्या विभागांच्या व वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन दिल्या जातात. या सर्व सेवा १५ ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती महा आयटीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी आज येथे दिली.
महा-आयटीमार्फत शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्धतेच्या अनुषंगाने स्थानिक आपले सेवा केंद्र चालकांच्या भेटी घेणे व स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेणे यासाठी आज काटकर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी सांगितले की, सेवा अधिनियमाअंतर्गत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या या सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु असून, त्यात 138 सेवा या 31 मे पर्यंत एकत्रीत केल्या जाणार आहे. त्यापैकी ९२ सेवा एकत्रित केल्या आहेत. तर 306 सेवा या ऑफलाईन दिल्या जातात.अशा प्रकारे सर्व 1027 सेवा 15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांना देता येतील असे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.