गेल्या काही दिवसांपासून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सातवी पास भोलाकुमार चौधरीला अटक केली आहे. ज्याने २७ लाख ६५ हजार रुपये उकळले. विशेष म्हणजे, २१ गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. चौधरी हा मूळचा सांताक्रूजमधील रहिवासी असून, तो बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. जुलै २०२४ मध्ये भोलाकुमार चौधरीने आपल्या मित्रासोबत वाशी सेक्टर-१७ येथील महावीर सेंटरमध्ये ‘बोल्टकॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला दरमहा ९% परतावा देण्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांना आकर्षित केले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने तीन महिने नियमित परतावा दिला, मात्र त्यानंतर पैसे अडवून ठेवले. गुन्हे शाखा कक्ष-१ ला चौधरीच्या फसवणुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डमी गुंतवणूकदार पाठवून पडताळणी केली. तपासादरम्यान चौधरी मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात भोलाकुमार चौधरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि आणखी कोण गुंतले आहे का, याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी अशा मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडता, गुंतवणुकीपूर्वी पूर्ण शहानिशा करावी, असा पोलिसांनी इशारा दिला आहे.