तालुक्यातील राहुड घाटात शुक्रवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर राहुड घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंटेनर, दोन ट्रक, दोन ते तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातात उषा मोहन देवरे (४५, रा. भारतीनगर, मालेगाव) या महिलेचा मृत्यू झाला. तर अभिमान त्रंबक देवरे (४३, भारतीनगर, मालेगाव), मीराबाई महादू पवार (५०, मालेगाव) सार्थक योगेश पाटील (७, मालेगाव), शितल सुरज चव्हाण (१५, मालेगाव), रोशनी बापू महाले (६५, सटाणा), ज्योत्स्ना तेजस महाले (३०, रा. श्रीकुरवाडे, सटाणा), बापू मानसिंग महाले (७०, सटाणा), जिजाबाई भिला देवरे (७०, मालेगाव) हे गंभीर जखमी झाले. तर तेजस बापू महाले (३८, सटाणा), तनवीर आणि शेख (३२, मुंबई), अफ्रिन तनवीर शेख (३२, मुंबई), सोनाली योगेश पाटील (३५, मालेगाव), बळीराम त्र्यंबक देवरे (५०, मालेगाव), याना तन्वीर शेख (७, मुंबई), रोमेहा तनवीर शेख (५, मुंबई), आरवा तनवीर शेख (दीड महिना), रेणुका योगेश पाटील (दीड वर्ष, मालेगाव) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची एकच गर्दी झाली होती होती.