मराठी नववर्ष अर्थात चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढीपाडव्याने होत असते. याच गुढीपाडव्याच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मराठी नववर्षाारंभ आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे देवीची काकडआरती झाल्यानंतर सूर्योदयावेळी मंदिराच्या आवारात गुढी उभारण्यात आली. तर देवीच्या दर्शनाने येणारे नववर्ष सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करणाऱ्या हजारो भाविकांना वेळेवर दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली होती.